गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

   वाहन उद्योग : वर्तमान आणि भविष्य  - भाग ३ 

मोटारीप्रमाणे आज दुचाकीचे महत्त्वपूर्ण रूप विशेष करून आशिया खंडात पाहावयास मिळते. सर्वसामान्य जनतेचे वैयक्तिक, कौटुंबिक व व्यावसायिक असे वाहन म्हणजे स्कूटर, मोटारसायकल असे हे समीकरण बनले आहे. यामुळे भारतात एकूण वाहनांच्या विक्री-वापर या तुलनेचा विचार करता भारतीय बाजारपेठेत तर सुमारे ७० टक्क्यांचा वाटा या दुचाकींनी उचललेला दिसतो.


दुचाकी- मोटारसायकल- स्कूटरदुचाकीच्या निर्मितीचा आढावा घेताना तीन प्रकारांकडे लक्ष द्यावे लागेल.त्यात मोटारसायकल, स्कूटर व तीनचाकी रिक्षा सदृशवाहने, या तीन प्रकारांच्या अनुषंगाने दुचाकीच्या इतिहासाकडे पाहावे लागेल. या साऱ्या प्रकाराची जननी होती ती म्हणजे सायकल. घोड्याद्वारे गाडी ओढून वाहतूक करण्याचे साधन म्हणजे घोडागाडी. या घोडागाडीऐवजी स्वयंचलित अशी गाडी बनविण्याचे स्वप्न १९ व्या शतकात पाहिले गेले. १८८४ मध्ये व्यावसायिकदृष्ट्या आरेखित करण्यात आलेले तीनचाकी स्वयंचलित वाहन ग्रेट ब्रिटनमध्ये एडवर्ड बटलर यांनी तयार केले. सिंगल सिलेंडरचे आडवे गॅसोलीन इंजिन पुढील चाकांदरम्यान बसविण्यात आले होते. मागील चाक एकच होते. पुढील चाके ही नियंत्रणासाठीही वापरता येत होती. ती चाके गाडीला गती देण्याचे काम करीत नव्हती तर या इंजिनातून मिळणारी गती मागील चाकाला देण्यासाठी एका साखळीद्वारे मागील चाकाला संलग्न करण्यात आली होती. इंधनाचे अंतर्गत ज्वलन केले जाऊन त्यातून तयार होणाऱ्या ऊर्जेचे परिवर्तन वाहनाला गती देण्यात होते.
एकंदर वाहनाला स्वयंचलित बनविण्यासाठी इंजिन ही एक आगळी यंत्रणा तयार होत होती. त्या काळात इंधन म्हणून वा ऊर्जा तयार करण्याचे साधन म्हणून वाफेचे इंजिनही वापरले गेले. एका तीनचाकी वाहनावर हा प्रयोग करण्यात आला होता. स्वयंचलित वाहन मग ते मोटार असो की सायकलसदृश वाहन असो; ती विकसित होण्याची क्रिया एका रात्रीत झालेली नाही. त्यात बराच काळ जावा लागला. त्यात सापडणाऱ्या गुण-दोषांचा विचार करून वाहनाचा विकास झाला. औद्योगिक क्रांतीने युरोपातील एकंदर जनजीवन कसे ढवळून निघत होते, त्याचे प्रत्यंतरच वाहनांच्या एकंदर निर्माण प्रक्रियेतून दिसून येते असे म्हणावे लागेल. वाहनाला ऊर्जा देणारे इंजिन हे महत्त्वाचे. या दुचाकी वाहनांना केवळ उपयुक्ततेचे साधन म्हणून नव्हे तर क्रीडा स्पर्धेतील एक उल्हासी व उत्साही वाहन म्हणूनही फार महत्त्व प्राप्त झालेले दिसते. लष्करी कामातही मोटारसायकलींनी फार मोठी कामगिरी बजावलेली आहे. पहिल्या व दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये या दुचाकींमुळे दळणवळण व संपर्काची अनेक कामे फत्ते करण्यात त्या त्या देशांच्या जवानांनी बाजी मारली होती.
युरोपमध्ये साधारण पहिल्या जागतिक महायुद्धात सशस्त्र दलाच्या सर्व प्रकारच्या तुकड्यांमध्ये, शाखांमध्ये मोटारसायकलींचा वापर झाला. त्यानंतर त्यांची लोकप्रियता चांगलीच वाढली. त्यानंतर पहिल्या जागतिक मंदीपर्यंत मोटारसायकलींच्या वापराचा, खेळातील सहभागांचा आनंद चांगलाच लुटलाही गेला. दुसऱ्या महायुद्धानंतरही या मोटारसायकलींचा वापर सर्व स्तरावर होऊ लागला. त्यानंतर झालेल्या संशोधनांमधील प्रगतीनुसार मोटारसायकलीचे रूप बदलत गेल. शर्यतींमधील मोटारसायकल, पर्यटनासाठी वा प्रवासासाठी मोटारसायकल असा विविध दृष्टीने वापर होत गेला.
सायकलीला स्वतंत्रपणे इंजिन लावून त्या सायकलींचा मोटारसायकलीसारखा वापर करण्याचा युरोपातील काही भागांमध्ये असलेला वापरही लक्षणीय होता. अशा पद्धतीच्या सायकलच्या वापरामधूनच हलक्या वजनाच्या मोटारसायकलीही बनवून विकसित करता येतात, याची जाण संशोधकांनाही झाली असावी. १९ वे शतक हे एकूणच वाहनविकासाच्या दृष्टीने लक्षणीय म्हणावे लागते.
१९०० मध्ये अनेक प्रकारच्या सायकलींना लहान मोठ्यो स्पार्क इग्निशनची इंजिने बसविण्याचे प्रयत्न केले गेले. या साऱ्या प्रयत्नांना एक विश्‍वासार्हता हवी यासाठी रस्त्यावर या प्रकारच्या गाड्यांची चाचणी घेण्यात आली, स्पर्धात्मक अशी ही चाचणी होती. यासाठी १९०७ मध्ये टुरिस्ट ट्रॉफी स्पर्धा आयोजिण्यात येत होत्या. अशा प्रकारच्या स्पर्धात्मक कार्यक्रमांमुळे नवीन कल्पना पुढे येत होत्या. त्यातून टू स्ट्रोक सायकलीचे आरेखन झाले व बहुव्हॉल्व इंजिन एरोडायनॅमिक आकाराची कार्बन फायबर शरीराची रचनाच त्या मोटारसायकलीला प्राप्त झाली. १८८५ मध्ये गॉटेलीब डैमलर व विलहेल्म मेबॅच यांनी जर्मनीमध्ये गॅसोलीन इंजिन असणारी पहिली मोटारसायकल तयार केली, जी दुचाकी होती. ही दुचाकी मोटारसायकलीची नांदी म्हणावी लागेल. सर्वसाधारण सायकलीची रचना होती इतकेच, पण शास्त्रीय दृष्टीने तत्कालीन सायकलीपेक्षा ती खूप वेगळी होती. वाफेवर चालणारी दुचाकी ही मोटारसायकल म्हणून विचारात घेतली तर त्याचे पहिले श्रेय सिशॉक्सपेरॉक्स या फ्रेन्च व्यक्तीला द्यावे लागेल. त्यानंतर त्या पद्धतीमधील वाहन १८६९ मध्ये सिल्व्हेस्टर एच. रोपर रॉक्सबेरी या मॅसेच्युसेट्‌स येथील संशोधकाने तयार केले होते. तो त्याचे हे यांत्रिंक वाहन सर्कशीत व जत्रेमध्ये लोकांना दाखवीत होता. अमेरिकेत १८६७ मध्ये त्याने ते लोकांसमोर या जत्रांमधील सर्कशीच्या माध्यमातून आणले. काही असले तरी पेट्रोजन्य पदार्थाचा इंधन म्हणून वापर केला गेलेली मोटारसायकल ही पहिली मोटारसायकल म्हणून गणतीत घ्यावी लागेल. मोटारसायकलीची पहिली निर्मिती कोणी केली तर त्याचे श्रेय डैमलर यांच्या रैटवॅगन या वाहनाला द्यावे लागते. १८९४ मध्ये हिल्डब्रॅण्ड आणि वुल्फ म्युल्लर यांनी प्रथम पिढीतील मोटारसायकलीचे उत्पादन सुरू केले, ज्या वाहनाला मोटारसायकल म्हणून मानले गेले. कारण सुरुवातीच्या काळात सायकलींना इंजिन जोडून त्यांना मोटारसायकलीचे रूप व गुण देण्याचा प्रयत्न होत होता. त्याचप्रमाणे संशोधकांचेसुद्धा विषय व क्षेत्र बदलत होते. १९ व्या शतकातील ही गोष्ट आहे. कारण ज्यांनी सुरुवातीला मोटारसायकलींसंबंधात काम केले असे संशोधक अन्य संशोधन विषयांकडे वळले होते. याचेच एक उदाहरण म्हणजे डैमलर व रोपर हे दोन संशोधक चारचाकी वाहनाच्या क्षेत्राकडे वळले होते. १९२० पर्यंत जगात मोटारसायकलींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. विशेष करून पहिल्या जागतिक युद्धापर्यंत हे उत्पादन भारतात होते. हडसन यांनी ६७ देशांमधील विक्रेत्यांना आपल्या मोटारसायकली विकण्याचा विक्रम केला होता. १९३० च्या सुरुवातीला डीकेडब्ल्यू ही मोटारसायकल विकण्यामध्ये आघाडीवर असलेली कंपनी होती. दुसऱ्या महायुद्धानंतर बीएसए समूह जगामध्ये सर्वाधिक मोटारसायकल विकणारा समूह ठरला. १९५० मध्ये त्यांनी वर्षाला ७५ हजार मोटारसायकलींचे उत्पादन केले. १९५५ ते १९७० पर्यंतच्या काळात जर्मनीतील एनएसयू या कंपनीने मोटारसायकलींच्या अधिक उत्पादनाचा मान मिळविला होता. स्पर्धेतील मोटारसायकलींचे महत्त्व हेदेखील अनन्यसाधारण आहे. तरुणांच्या मनातील उन्मादाला, उत्साहाला गवसणी घालणाऱ्या मोटारसायकलींच्या शर्यतींनी जगभरात नेहमीच भुरळ घातलेली दिसते. आजही मोटारसायकलींच्या शर्यतींचे आकर्षण तसे तसूभरही कमी झालेले नाही. या मोटारसायकली इंधनाच्या वापरासाठी बचतीच्या नसल्या तरीही शर्यतींचे आकर्षण सर्वांना असते. किमान या क्षेत्रात शर्यतींसाठी लाखो लोक जीव ओतत असतात. अशा या शर्यतींमध्ये १९५० मध्ये सुसूत्रीकरण यायला लागले होते. शर्यतींसाठी मोटारसायकलींचा विकास अधिक ठामपणे केला जाऊ लागला. मोटारसायकलीचे विशिष्ट आरेखन, रचना यामध्ये शक्य तितके जबरदस्त बदल होण्यास सुरुवात झाली. त्या काळातील विचारांच्या पुढे जाऊन या मोटारसायकलींच्या आरेखनात बदल होऊ लागले. तशी निर्मिती केली जाऊ लागली. जर्मनीच्या एनएसयू या कंपनीने तसेच मोटो गुझ्झी यांनी या विकासामध्ये मोठा वाटा उचललेला दिसून येतो. ग्रॅण्ड प्रिक्स या मोटारसायकल शर्यतीचे महत्त्व खूप होते. या शर्यतीमध्ये सहभागी होणाऱ्या मोटारसायकली या स्ट्रिमलाइन मोटारसायकली होत्या. २५० सीसी इतक्या ताकदीची इंजिने त्यांना बसविण्यात आलेली होती. शर्यतींमध्ये अपघातांचे प्रमाणही होते. १९५४ ते १९५६ या काळात झालेल्या अपघातांमध्ये एनएसयू कंपनीच्या चार मोटारसायकलस्वारांना प्राण गमवावे लागले व त्यानंतर या कंपनीने अशा मोटारसायकलींच्या विकासकामाला स्थगिती दिली व या प्रकारच्या शर्यतींमधूनही सहभागी होणे थांबिवले. स्ट्रिमलाइन मोटारसायकलींनी या शर्यती १९५७ पर्यंत जिंकल्या होत्या ही बाब नमूद करावी लागते. सुरक्षिततेच्या दृष्टीने काही बाबतीत मोटारसायकलींच्या शर्यतीवर बंदी घालण्याचे काम एफआयएम यांनी केले.
 
******************
एनफिल्ड-बुलेट
बुलेट ही मोटारसायकल तिच्या घक…धक अशा फायरिंगच्या आवाजामुळे, तिच्या दणकट व मजबूत बांधणी आणि

दिसण्यामुळे काहीशा राजेशाही थाटामुळे मोटारसायकलस्वारांच्याच नव्हे तर अन्य लोकांच्या मनातही एक स्वतंत्र स्थान पटकावून बसलेली आहे. खडतर व रफ-टफ रस्त्यावर सहजपणे नियंत्रित करता येईल अशी ही बुलेट सुरुवातीला १९३१
ते १९६६ या काळात रॉयल एनफिल्ड या उत्पादकाद्वारे तयार केली गेली. १९५५ पासून ती रॉयल एनफिल्ड मोटर्स यांनी उत्पादनात कायम ठेवली.
३४६ सीसी व ५०० सीसी सिंगल सिलिंडर असणारी कास्ट केलेल्या लोखंडी इंजिनाद्वारे सीन बर्न प्रक्रियेने इंजिन चालणारी ही बुलेट ४ गीयरची आहे.
१९३१ ते १९६४ या काळात ब्रिटन (यूके) येथील रॉयल एनफिल्ड कंपनीने तिचे उत्पादन केले. भारतात लोकांच्या कल्पनेला उंचावणारी अशी ही बुलेट १९५४ मध्ये भारत सरकारने पाकिस्तानच्या सीमेवर लष्करासाठी आणली. सुमारे ८०० बुलेट मोटारसायकली सुरुवातीला तेथे वापरण्यासाठी तैनात केल्या. आजही बुलेट म्हटली की डोळ्यासमोर उभी ठाकते ती १९५५ ची बुलेट!बुलेटच्या गुणविशेषांच्या जवळपास जाणारी एक मोटारसायकल भारतीय बाजारपेठेत उतरविण्यात आली होती. ती म्हणजे राजदूत. भारतीय बाजारपेठेत दुचाकीच्या इतिहासात सुरुवातीच्या काळात अशा दणकट मोटारसायकलींनी लोकांच्या मनात घर केले होते. आज राजदूतचे उत्पादन बंद झाले असले तरी बुलेट- रॉयल एनफिल्ड म्हणून एस्कॉर्टने तिची निर्मिती सुरू ठेवली आहे.
 
******************
१९६० पासून अगदी १९९० पर्यंत शर्यतींमध्ये टू स्ट्रोक मोटारसायकलींनी जगभरात लोकप्रियता मिळविली होती. १९५० मधील जर्मनीच्या वॉल्टर कॅड्डेन यांचा इंजिनासंबंधातील कामाचा वाटा यामागे काही प्रमाणात होता. आज जपानी कंपन्यांच्या मोटारसायकलींचा प्रभाव एकंदर जगभरात दिसतो. हडसन, बीएमडब्ल्यू या कंपन्या युरोपातील आहेत, त्यांचाही वाटा आज आहेच. पण जपानमधील होंडा, कावासाकी, सुझुकी, यामाहा या मोटारसायकल कंपन्यांच्या मोटारसायकलींचा प्रभाव जगात अधिक असल्याचे म्हणावे लागते. जशा अधिक ताकदीच्या शर्यतीच्या मोटारसायकली ज्या ३०० सीसी ताकदीच्यापेक्षा अधिक असतात, त्याचप्रमाणे त्यापेक्षा कमी ताकदीच्या मोटारसायकलींनी जगातील विशेष करून आशियातील तसेच आफ्रिकेतील बाजारपेठा काबीज केल्या आहेत. भारतीय कंपन्यांनीही या जगातील बाजारपेठेत आपले स्वत:चे वेगळे असे स्थान तयार केलेले आहे. हिरो मोटो कॉर्पची मोटारसायकलींसाठीची इंजिने आज सर्वाधिक खपाची म्हणूनही शाबीत झाली आहेत. बजाज, टीव्हीएस या भारतीय कंपन्यांनीही भारताव्यतिरिक्त अन्य देशांमध्ये मोटारसायकलींच्या बाजारपेठेत चांगले स्थान मिळविलेले आहे.
चीन, भारत, व्हिएतनाम व इंडोनेशिया या चार प्रमुख देशांमध्ये मोटारसायकलींचे प्रमाण अधिक असलेले दिसते. मोटारसायकल या वाहनाला इतके महत्त्वपूर्ण स्थान का आहे, याचे कारण या देशांमधील अर्थव्यवस्था व त्याचे परिणाम, इंधन कमी लागणे, सुकरता असणे, दळणवळणामध्ये व वापरामध्ये सुलभता व किफायतशीरपणा जाणवणे यामुळे मोटारसायकलींचे वा दुचाकींचे स्थान एकंदर वाहन उद्योगामध्ये मोठे आहे. त्यांचा तेथील एकूण बाजारपेठेतील वाटा अन्य वाहनांपेक्षा अधिक आहे. याशिवाय ब्राझील, सिंगापूर, ब्रिटन, तसेच युरोपातील शहरे येथेही मोटारसायकली वा स्कूटर्स यांना जीवनशैलीत महत्त्वाचे स्थान लाभले आहे. अमेरिकेतही दुचाकींना वाढती मागणी असल्याची आकडेवारी सांगते. इंधनाच्या विशेष करून पेट्रोलच्या वाढत्या किमतीचा हा परिणाम आहे हे नक्की.

– रवींद्र यशवंत बिवलकर