गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

    वाहन उद्योग : वर्तमान आणि भविष्य  - भाग ५ 

भारतातील तळागाळापर्यंत पोहोचलेल्या दुचाकी

मोटारसायकलींच्या आणि स्कूटर्सच्या बाबतीत भारतीय ग्राहक खूप चोखंदळ म्हणावा लागेल. नुसताच चोखंदळ नाही, तर आतापर्यंतच्या अनेक दुचाकींच्या विकासानुसार त्या दुचाकी स्वीकारून दुचाकी उद्योगाला भारतीय ग्राहकांनी खूप मोठे केले आहे असेच म्हणावे लागते. दुचाकींमधील स्कूटर्स, मोटारसायकली आणि मोपेड, स्कुटीसारखी वाहने अगदी गीयर्सपासून गीयरलेसपर्यंतच्या स्कूटर्स, बॅटरी-विजेवर चालणाऱ्या दुचाकींनी भारतीय ग्राहकाला अनेक पर्याय दिले. स्वातंत्र्योत्तर काळात सर्वसामान्यांचे खासगी वाहन म्हणून या दुचाकींनी मोठी कामगिरी बजावलेली आहे. त्यांचा वाढता खप व वाढती लोकप्रियता ही दुचाकींच्या मोठ्या उपयुक्ततेचीच ग्वाही असल्याचे म्हणता येईल.



भारतीय ग्राहक तसा चोखंदळ आहे. तो शहरातील असो की ग्रामीण भागातील, त्याचे रस्ते खडकाळ असोत किंवा डांबरी वा कॉंक्रीटचे असोत, इतकेच कशाला पायवाट असो किंवा नसो तेथेही या दुचाकींचा वापर केला जातो. इतकी त्यांची गरज आज भारतातील अनेक शहरांमध्ये, गावांमध्ये, पाड्यांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळेच त्यांचा वापरही वैविध्यपूर्ण असल्याचे दिसते. एकेकाळी दुधाचा व्यवसाय करणार्‍यांना दुचाकी, मग ती एनफिल्ड, जावा, यझ्दी, असो की एम ५० वा एम ८० सारखी छोटेखानी स्कूटर असो, त्या दुचाकीचा वापर त्यांच्याकडून अगदी अधिकाधिक केला गेला आजही तो तसा होत आहे. तसाच वापर करून अन्य छोट्या व्यावसायिकांनीही दुचाकीमुळे आपला व्यवसाय अधिक विकसित केला. शहरांमध्ये एकेकाळी या मोटारसायकलींचा वापर हा तसा कमी प्रमाणात होत होता. स्कूटर्सचा वापर अधिक होत होता. त्यानंतर मात्र मोटारसायकलींना मागणी वाढत गेली. एके काळी लॅम्ब्रेटा, व्हेस्पा व बजाजच्या सुपर, चेतक या स्कूटर्सनी जनमानसात एक वेगळे स्थान पटकाविले होते. या स्कूटर्सनी ग्रामीण व शहरी भागात ग्राहकांच्या विविध प्रकारच्या सेवा बजाविल्या. चालकासाठी असणारी स्प्रिंगची त्रिकोणी आकाराची आसनव्यवस्था ही सस्पेंशनसारखी काम करणारी होती, ही बाब आज पटू लागली आहे. पण त्या काळात स्कूटर्सना असणारे सस्पेंशन, खराब रस्ते यामुळे या स्कूटर्समुळे पाठीचे दुखणे ओढवते, असा एक समजही तयार झाला होता. हे सारे समज- गैरसमज कालांतराने वाढले व कमी झाले. त्या स्कूटर्समधील दोष व गुण आता नवीन पिढीला समजण्यापलीकडचे आहेत, कारण त्या स्कूटर्स आता उत्पादनात नाहीत. नव्या प्रकारच्या गीयरलेस स्कूटर्सचा जमाना असल्याने व त्यांच्या वेगात सुधारणा झाली असल्याने त्या फोर स्ट्रोक पद्धतीच्या व पर्यावरणलक्ष्यी असल्याचा दावा होऊ लागल्याने एक प्रकारे जुन्या स्कूटर्सचे महत्त्व कमी झाले आहे. सर्वांना चालवायला सोपी असणारी स्कूटर तयार झाली व गीयरच्या स्कूटर्स मागे पडल्या ही मात्र आजची वस्तुस्थिती आहे.

मोपेडनेही भारतातील ग्रामीण व शहरी भागात जम बसविला होता. टीव्हीएस, कायनेटिक, हिरो, बजाज आदी कंपन्यांच्या मोपेड्‌स स्कूटी यामुळे महिला वर्गालाही सायकलसारख्या स्वचलित दुचाकीवरून स्वयंचलित दुचाकीवर आणण्याचे श्रेय हे नक्कीच या मोपेड्‌स प्रकारातील दुचाकींना द्यावे लागेल. या दुचाकींची लोकप्रियता भारतात मोठ्या प्रमाणावर आहे, त्याची कारणे ग्रामीण व शहरी भागांनुसार वेगवेगळी आहेत. दुचाकींमध्ये प्रामुख्याने मोटारसायकल, स्कूटर व मोपेड्‌स अशा तीन वर्गवारींमध्ये विभाजन होते. भारतात आजच्या घडीला स्कूटर्सपेक्षा मोटारसायकलींचे प्रमाण वाढले आहे, वाढत आहे. हिरो मोटो कॉर्प, होंडा, बजाज, टीव्हीएस, यामाहा, सुझुकी या प्रमुख कंपन्यांच्या मोटारसायकली दिसून येतात. मोटारसायकलींसाठीची ही सध्याची बाजारपेठ तरुणांची झाली असल्याचे या मोटारसायकलींच्या खपाकडे पाहून म्हणावे लागेल. स्कूटर्समध्ये होंडा, सुझुकी व टीव्हीएस, महिन्द्र या कंपन्यांची उत्पादने आहेत. एके काळी स्कूटर उत्पादनांमध्ये असणाऱ्या बजाजने स्कूटर्स उत्पादने बंद केली असून व्हेस्पाचा अलीकडेच पुन्हा प्रवेश झाला आहे. पायाभूत सुविधांमध्ये होत असणारी वाढ, शहरांमध्ये येण्याचे वाढलेले प्रमाण व त्यामुळे शहरांमध्ये आवश्यक असणारी दळणवळणाची साधने कमी पडत असल्याने दुचाकींचे प्रमाण वाढले आहे. इंधन बचतीसाठी सक्षम दुचाकी असते. इंधनांवर होणारा खर्च, सार्वजनिक वाहतुकींमध्ये जवळच्या अंतरांसाठी वाया जाणारा वेळ लक्षात घेऊन दुचाकींचे प्रमाण वाढले. तरुणांच्या आकांक्षा, अपेक्षा, गरजा, दृष्टिकोन बदलले आहेत. यामुळेच दुचाकींमध्ये, विशेष करून मोटारसायकलींसाठी मागणी वाढलेली दिसते. व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यायेण्याची प्रमुख आवश्यकता असल्याने मोठ्या शहरांपासून लहान तालुक्याच्या शहरांपर्यंतच्या भागामध्ये मोटारसायकली किंवा स्कूटर्स यांची आता मोठी गरज निर्माण झालेली आहे. काही कंपन्यांच्या स्कूटर्ससाठी तीन महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक ठिकाणी कौटुंबिक वाहन म्हणून दुचाकींचा उपयोग होताना दिसतो. एका कुटुंबातील पती, पत्नी व दोन मुले निर्धास्तपणे मोटारसायकल वा स्कूटरवरून रस्त्यांवर फिरत असल्याचे चित्र आहे. ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने व कायद्याचे उल्लंघन करणारी असली तरी त्याचा विचार फार गांभीर्याने केला जात नाही, ही चिंतेची बाब नक्कीच आहे. मात्र एकूणच दुचाकीचा हा वाढता वापर लक्षात घेता दुचाकीचे महत्त्व लक्षात येऊ शकते.

आरेखन, सुरक्षितता आणि नवीनता

गेल्या काही वर्षांमध्ये मोटारसायकलींमध्ये व स्कूटर्समध्ये तांत्रिक दृष्टीने विविध बदल झालेले दिसतात. टू स्ट्रोकच्या ऐवजी फोर स्ट्रोक इंजिन आले असून त्यामुळे पर्यावरणलक्ष्यी वाहन तयार झाले. तसेच मुख्य म्हणजे इंधनाची बचत होऊ शकली. याशिवाय पिकअपमध्ये झालेली वाढ, बॅलन्सचा वापर, मध्यभागी इंजिन, बॉडीमध्ये विशेष करून स्कूटर्सच्या बॉडीमध्ये पाइपचा वापर करण्यात आला, पत्रे एकमेकाला जोडून तयार करण्यात येणारी बॉडी व त्यामुळे वाढणारे वजन दूर करण्यात आले. पत्र्याऐवजी प्लॅस्टिक, फायबरचा वापर सुरू झाला, रंगामध्ये साध्या रंगाबरोबर मेटॅलिक रंगाचा वापर सुरू झाला, मोटारसायकलींच्या बॉडीमध्येही डायमंड चासीचा वापर होऊ लागला. त्यासाठी वापरण्यात येणारे लोखंड हे प्रक्रिया करून वापरले जाऊ लागले, हेडलॅम्प प्रखर झाले, आरेखनात तोचतोचपणा येऊ नये यासाठी प्रत्येक व्हर्जनमध्ये बदल केले जात असल्याचे चित्र दिसू लागले. ब्रेक्स लायनर्सपुरते न राहता डिस्क ब्रेक्स आले, इतकेच नव्हे तर व्हील अलॉय प्रकारची दिसू लागली, असे अनेक बदल या नवीन पिढीच्या मोटारसायकलींमध्ये व स्कूटर्समध्ये करण्यात आले. मोटारसायकलींच्या फ्रेम्स हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, त्यात आता नवीन पद्धतीचे बदल झाले आहेत. काही बदल पूर्णपणे नवीन तर काही बदल हे पूर्वीच्या फ्रेम्सचे, एक प्रकारे नूतनीकरण वा सुधारित आवृत्तीमधील म्हणावे लागतील. पूर्वी बॅकबोन या प्रकारातील फ्रेम मोटारसायकलीच्या बांधणीमध्ये वापरण्यात येत होती. सर्वसाधारणपणे मोटारसायकलीची बॉडीची रचना मानवी शरीरावर आधारभूत असते. मानवी शरीराचा विचारही या रचनेमध्ये केला जातो, ज्यामुळे मोटारसायकलस्वाराला त्रास कमी व्हावा, ही धारणा त्यामागे असते. विविध प्रकारच्या या रचनेद्वारे मोटारसायकलस्वाराला मिळणारा आरामदायी अनुभव, सुरक्षितता, स्थिरता या बाबी लक्षात घेतल्या जातात.


बॅकबोन फ्रेम – ही फ्रेम हिरो होंडाच्या सीडी १०० या प्रकारच्या मालिकेतील मोटारसायकलींना देण्यात आली होती. त्यात केलेले आरेखन हे तसे साधे, सोपे होते. स्पोर्टी मोटारसायकलींसारखे या रचनेचे स्वरूप नसल्याने मोटारसायकल असूनही ती स्पोर्टी म्हणून म्हणता येणार नाही. या रचनेमध्ये इंजिन फ्रेमवर बोल्टच्या साहाय्याने आधारभूत होते. स्टिअरिंगला हे संलग्न असणारे स्वरूप होते. डायमंड फ्रेम-सायकलीच्या रचनेवर आधारित असणारी ही फ्रेम आज भारतातील सर्वसाधारण मोटारसायकलींसाठी सर्रास वापरण्यात येत आहे. हिऱ्याच्या संरचनेत दिसणाऱ्या आकारावर आधारित असणारी ही फ्रेम कमी मूल्यातील असून त्यातील एक बाजू (वरची) ही स्टिअरिंग रॉडला जोडणारी आहे, तर दुसरी बाजू इंजिन पेलणारी आहे. पल्सर, सीबीझेड, अचिव्हर, करिझ्मा, एनफिल्ड, यामाहा या मोटारसायकलींसाठी आज या फ्रेमचा वापर केला जातो. त्यात डायमंड फ्रेम हे स्ट्रस रचनेसहदेखील तयार केलेले आहे. क्रेडल फ्रेम – बॅकबोन प्रकारातील व डायमंड फ्रेम प्रकारातील रचनेवर आधारित फ्रेम आरेखनाचा हा प्रकार. या रचनेत स्टिअरिंगला संलग्न असणाऱ्या बाजूतून तळातील बाजूने एक पाइपलाइन खाली आणून ती मागील त्रिकोणी आकाराच्या रचनेला संलग्न केलेली असते. त्यावर इंजिन ठेवण्यात येते. या इंजिनाचे अतिवजन या फ्रेमवर येत नाही, अशी रचना असते. सीडी डॉन, प्लॅटिना, स्प्लेंडर या प्रकारच्या मोटारसायकलींसाठी ही रचना देण्यात आलेली आहे.

ट्रेलिस फ्रेम – पाइप एकमेकांना विशिष्ट प्रकारे वेल्ड करून तयार करण्यात आलेल्या रचनेवर मोटारसायकलीचे इंजिन व


त्याचे आरेखन अवलंबून असते. केटीएम २०० ड्युक या प्रकारच्या मोटारसायकलीला ही फ्रेम देण्यात आली आहे. वजनाने हलकी असणारी व मजबूत असणारी ही फ्रेम स्पोर्टी मोटारसायकलीसाठी विशेष करून वापरण्यात येते.

पेरीमीटर फ्रेम किंवा दुहेरी (ट्‌विन) स्पार/बीम फ्रेम- बजाज पल्सर २०० एनएस व यामाहा आर १५ या दोन भारतीय मोटारसायकलींमध्ये ही फ्रेम वापरण्यात आली आहे. मोटारसायकलीचे इंजिन या फ्रेमवर आधारलेले नसते. शर्यतीच्या मोटारसायकलींमध्ये असणारी


ही फ्रेम तयार करण्याच्या दृष्टीने महाग मानली जाते. नियंत्रणासाठी, चांगल्या ब्रेकिंग प्रक्रियेसाठी हाताळण्यास महत्त्वपूर्ण मानली जाणारी ही रचना आहे. मोनोकॉक फ्रेम – मोटारींप्रमाणे बॉडी पॅनेलसंलग्न असणारी ही फ्रेम मोटारसायकलींनाही काही कंपन्यांनी दिलेली आहे. ही वेगळ्या प्रकारची रचना असून भारतीय मोटारसायकलींमध्ये तरी तूर्तास ती नजरेस पडत नाही.

मोटारसायकलींच्या रचनेमध्ये असणारे फ्रेमचे प्रकार व त्यात केलेले कंपनीनिहाय बदल हे दर सुधारणेमध्ये काही ना काही नवीन बाब सामावून घेणारे असून आजच्या घडीला मोटारसायकलींची रचना ही पूर्वीच्या मोटारसायकलींपेक्षा अधिक आकर्षक करण्यासाठी उपयुक्त ठरली आहे. आसनांची व्यवस्थाही आता बदललेली दिसते. स्कूटर्समध्येही अशा प्रकारचे बदल झाले आहेत. पूर्वी बजाज, व्हेस्पा या स्कूटर्समध्ये पत्रे एकमेकांना जोडून तयार स्कूटरची बॉडी म्हणजे तिचे शरीर तयार केले जात असे. आता डायमंड चासी वा ट्युब्युलर चासीवर आधारित म्हणजे मोटारसायकलीसारखे अंतर्गत रूप देत त्यावर पत्र्याचे वा प्लॅस्टिक-फायबरचे पंख जोडून वा लावून स्कूटरचे बाह्य रूप तयार केले जाते. पूर्वीच्या पत्रे एकमेकांना जोडून तयार करण्यात येणाऱ्या स्कूटर्स वजनाने अधिक होत्या पण त्या तितक्याच दणकटही होत्या. टिकावूपणा होता. आता तसे नाही. नवीन स्कूटर्स चालवायला सोप्या, वजनाने हलक्या, नियंत्रणाला सोप्या आहेत. पण त्यामुळे त्यांचे आयुष्य व सुटे भाग यांचे बदलही वारंवार करावे लागत आहेत, अर्थात हे सारे कालाय तस्मै नम: … असे म्हणून नवीन बदल स्वीकारावे, कारण हा सारा उद्योग व त्यांचा प्रसार हा नफ्यातोट्याचा उद्योग बनला आहे हे नाकारून चालणार नाही.

टू स्ट्रोकवरून फोर स्ट्रोट इंजिन हा सर्वात महत्त्वाचा व किफायतशीर बदल आहे. पेट्रोल भरताना त्यात टुटी ऑईल टाकावे लागत नाही, असे हे इंजिन मायलेजही चांगले देणारे असल्याने व वेग क्षणार्धात प्रदान करणारे आहे. किंबहुना नवीन गतिमान युगाचे हे संकेत आहेत.

मोटारसायकलीच्या आसनव्यवस्थेची रचना नवीन पिढीला आकर्षित करणारी आहे. पुढील बाजूने निमुळती आसणारी ही आसने मागे बसणाऱ्यासाठी काहीशा अधिक उंचीची व लहान आकाराची देण्यात आल्याचे अनेक मोटारसायकलींच्या मॉडेल्सवर नजर घातली असता दिसून येते. ही रचना व त्यामुळे सडपातळ बांधा प्राप्त झालेली एकंदर त्या मोटारसायकलीच्या रचनेचे आकर्षण न वाटले तरच नवल. वाऱ्याला काप जू शकले, अशी ही रचना वेगाला आमंत्रित करणारी आहे. स्कूटरच्या रचनेतही ज्या पद्धतीचे बदल करण्यात आले आहेत, ते पाहता दुचाकींच्या रचनेत उपयुक्ततेपेक्षा वेग, देखणेपण आणि कमी मूल्य राखण्याचे गणित उत्पादकांनी केले आहे. मात्र तरीही किमतीच्या एकूण तुलनेत दुचाकींच्या किमती ५० हजार रुपयांच्या वरच गेलेल्या आहेत. त्या कमी नाहीत, हे मान्य केले तरी त्यांच्या विक्रीमध्ये असणारी वाढ लक्षात घेता दुचाकीचे आकर्षण, गरज अजूनही भारतीय बाजारपेठेत स्पर्धात्मक स्वरूपात राहिली आहे. काळानुसार सर्वांना म्हणजे ग्रामीण, शहरी, निमशहरी भागात या दुचाकींची गरज वाढू लागली आहे. वाहन उद्योगांमधील दुचाकींची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, हेच या उद्योगाचे यश म्हणावे लागेल.

– रवींद्र यशवंत बिवलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा