सोमवार, १७ जुलै, २०२३

  वाहन उद्योग : वर्तमान आणि भविष्य  - भाग २ 


 चक्राने दिली गती….

बैलगाडी, रेडागाडी, घोडागाडी अशी प्राण्यांच्या साहाय्याने खेचण्याची वाहने व त्यासाठी बनविण्यात येणाऱ्या गाड्या, त्याचप्रमाणे माणसांनी वाहून नेण्याच्या पालख्या अशा वाहन व्यवस्थेमध्ये भर पडली ती सायकलींची. सर्वसामान्यांचे एक प्रमुख वाहन असणारी सायकल ही साधारण प्रवासी वाहतुकीचे साधन होती. त्या सायकलीला स्वयंचलित करण्यात आले. त्यापूर्वी १७६९ मध्ये वाफेच्या इंजिनाचा शोध लागल्याने वाहतुकीच्या साधनांच्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने गती मिळू लागली. मोटारीच्या निर्मितीच्या या नांदीने मोटार उद्योगाला सुरुवात झाली असे म्हणता येईल.
 वाहननिर्मितीचा मागोवा

आजच्या वाहन संकल्पनेत जमिनीवरील वाहतुकीच्या दृष्टीने विचार करता मानवी समाजात चक्राचा शोध लागला आणि माणूस चक्राकार गतीने पुढे सरकू लागला. मानवी समाजाच्या प्रगतीला या चक्राने पुढे नेले, गती दिली. चक्रामुळे अनेक गोष्टी साध्य झाल्या, त्यामुळे व्यवहारातील अनेक बाबींना गती मिळाली. चक्राचा वापर होऊ लागल्यानंतर त्याद्वारे वस्तू पुढे जाण्यास वा नेण्यास सोयीचे असल्याचे आढळून आले. जमिनीवरील वस्तू ढकलत नेताना ती वस्तू चौकोनी असेल तर कठीण असते, पण ती गोल वा वर्तुळाकार असते तेव्हा ती प्रक्रिया काहीशी सहज बनू शकते. चक्राचा शोध हा इसवीसनापूर्वी लागला आहे. सुमारे पाच ते सात लाख वर्षांपूर्वी हे चक्र-चाक माणसाला समजले. संस्कृतीचे वहनही झाले. त्यावरूनच चक्र, त्या चक्राचा व्यास, परीघ या संकल्पना अस्तित्वात आल्या. या चक्राचा उपयोग गाडीमध्ये झाला व गाडी पुढे सरकली. अशा या चक्राचा शोध नेमका कोणत्या संस्कृतीमध्ये लागला आहे त्याचा थांग लागलेला नसला, त्याबद्दल वाद असले तरी या चक्रामुळे वाहन संकल्पनेला नक्कीच चालना मिळाली आहे. ढकलगाडीसारखी वस्तू केली गेली. आजच्या ऑटोमोबाइल उद्योगाचा हे चक्र म्हणजे पाया आहे. या चक्राला गती देण्यासाठी ऊर्जेचा वापर झाला आणि ऊर्जेच्या काही प्रकारांचा उपयोग या चक्राला गती देण्यासाठी केला गेला, वाहनाला गती मिळाली.

बैलगाडी, रेडागाडी, घोडागाडी अशी प्राण्यांच्या साहाय्याने खेचण्याची वाहने व त्यासाठी बनविण्यात येणाऱ्या गाड्या, त्याचप्रमाणे माणसांनी वाहून नेण्याच्या पालख्या अशा वाहन व्यवस्थेमध्ये भर पडली ती सायकलींची. सर्वसामान्यांचे एक प्रमुख वाहन असणारी सायकल ही साधारण प्रवासी वाहतुकीचे साधन होती. त्या सायकलीला स्वयंचलित करण्यात आले. त्यापूर्वी १७६९ मध्ये वाफेच्या इंजिनाचा शोध लागल्याने वाहतुकीच्या साधनांच्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने गती मिळू लागली. मोटारीच्या निर्मितीच्या या नांदीने मोटार उद्योगाला सुरुवात झाली असे म्हणता येईल.

■ मोटारनिर्मितीची वाटचाल

ज्ञानप्रसार, विज्ञानप्रसार, अभिव्यक्ती, संशोधन यासाठीचे स्वातंत्र्य आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केवळ प्रवासी वा मालवाहतूकच नव्हे तर ज्ञान व बुद्धी यांचेही वहन सक्षमपणे करू शकेल असे एक क्षेत्र आहे ते म्हणजे ऑटोमोबाइल वा ऑटोमोबिल, ज्याला आपण वाहन उद्योग म्हणू शकू. स्वयंचलित वाहनाचा उगम नेमका कुठे व कधी झाला, याचे स्पष्ट उत्तर देता येत नाही. याचे कारण म्हणजे वाहननिर्मिती ही एकाच व्यक्तीची वा कंपनीची वा एकाच प्रकारच्या तत्त्वातील संशोधनाची मक्तेदारी नाही. ती मक्तेदारी कोणत्याही एका विशिष्ट देशाचीही नाही. ही मक्तेदारी आहे स्वतंत्र अशा संशोधक वृत्तीची. मग तो संशोधक इंग्लंडमध्येही होता, फ्रान्समध्येही होता व अमेरिका, जपान, चीन, जर्मनी या देशांमध्येही होता. तो संशोधक ही व्यक्ती नव्हती तर प्रक्रिया होती. विकासाची पावले पडत वाहन विकास साध्य होत गेला. ऊर्जेचा शोध, ऊर्जेचा वापर व त्यातून मिळणारे गुणदोष व त्यातून शिकले जाणारे शहाणपण यांचा वापर केला गेला व त्यातूनच खऱ्या अर्थाने स्वयंचलित वाहनांचे स्वतंत्र जग तयार होत गेले. तयार झाले आणि भविष्यातही ते तयार होत राहणार आहे.

महाकाय आकारापासून ते अगदी छोटुशा दुचाकीपर्यंत असणारी वाहने, यंत्रे जी स्वत:च्या शक्तीतून पुढे सरकू लागली. अशा या वाहनांना आपण ऑटोमोबाइल वा स्वयंचलित वाहन म्हणू शकू. १७६९ मध्ये वाफेच्या निर्मितीतून तयार झालेल्या ऊर्जेद्वारे वाहतुकीचे साधन म्हणून एक वाहन निर्माण केले गेले. ती सुरुवातीची वाफेची इंजिने ही नांदी होती. ती परिपूर्ण नव्हती. त्यातून तयार होणारी ऊर्जा ही सिलिंडरला गरम करण्यात अधिक वाया जात होती. त्या ऊर्जेचा अपव्यय होत होता. १७७५ मध्ये जेम्स वॉटने वाफेचे इंजिन तयार करेपर्यंत वाफेच्या इंजिनाचा खऱ्या अर्थी वापर कसा होऊ शकतो ते स्पष्ट होऊ शकले नव्हते. कूगनॉट याने १७६९ मध्ये वाफेच्या इंजिनावरील ट्रॉली तयार केली होती. त्यानंतर १७७२ पर्यंत दुसरे वाफेच्या इंजिनावरील वाहन तयार झाले नव्हते. १७७२ मध्ये चीनच्या सम्राटांसाठी फर्डिनांड व्हर्बीएस्ट याने तयार केलेले वाहन हे केवळ एक खेळणे म्हणून तयार करण्यात आले होते. इंग्लंडमधील रेडरूथ येथे १७८४ मध्ये विल्यम मरडॉक याने वाफेच्या इंजिनावर चालणारे एक मालवाहू वाहन तयार केले होते; तर १८०१ मध्ये रिचर्ड ट्रेव्हिथिक याने कॅमबोम येथील रस्त्यावर एक पूर्ण आकाराचे वाहन चालविण्यात यश मिळविले. त्यामुळे वाहनाचा खऱ्या अर्थाने विचार सुरू झाला तो आणखी एका वेगळ्या दृष्टिकोनातून. तो दृष्टिकोन म्हणजे वाहनाला बहुवेगासाठी ट्रान्समिशनची (गीयर्स) पद्धत असून शकते, ब्रेक्स असतात. या बाबी पुढील काही दशकांमध्ये विकसित होत गेल्या.

कार्ल बेन्झ

वाफेच्या इंजिनाचा आणि रेल्वे या साधनाचाही विचार येतो. त्यामुळेच वाफेद्वारे चालणारे वाहन म्हटले की अनेकदा रेल्वेचे इंजिन समोर येते. तो काळ होता इंग्लंडमध्ये रेल्वे विकासाचा. रस्त्यावरील वाहनांऐवजी या रेल्वेच्या विकासाकडे अधिक लक्ष दिले जात होते. वाहननिर्मितीच्या या विविध टप्प्यांमधील महत्त्वाच्या संक्षिप्त नोंदींकडेही लक्ष दिल्यास या विकासक्रमातील काही बाबी लक्षात येतील.

वर्ष १७८९- ऑटोमोबाइलमधील पहिले पेटंट ओलिव्हर इव्हान्स यांना अमेरिकेत दिले गेले.

वर्ष १८६७ – वाफेच्या इंजिनावर चालणाऱी चार चाकी बग्गी

ओलिव्हर इव्हान्स

कशी असते, त्याचे प्रदर्शन कॅनडातील जवाहीर व्यावसायिक असलेल्या हेन्री सेथ टेलर यांनी स्टॅनस्टेड येथील एका जत्रेत केले. त्यानंतर वर्षभरात त्यांनी दोन सिलेंडरच्या वाफेच्या इंजिनाद्वारे मोठ्या चाकांची बग्गीवजा गाडी बांधली. कॉम्पॅक्ट व इंधनबचतक्षम असे इंजिन तयार करण्याच्या प्रयत्नांमधील तो एक भाग होता. 

वर्ष १८७३ – फ्रान्समधील अमेड्डी बोल्ली याने स्वयंचलित वाफेच्या इंजिनाची प्रवाशांच्या समूहाला नेऊ शकेल अशी एक गाडी बनविली.

वर्ष १८८६ – कार्ल बेन्झ या जर्मन संशोधकाला पेटंट मिळाले. मोटार कारचे हे पेटंट होते. हायड्रोजन फ्युएल सेल्सचा वापर गॅसोलीनच्या ऐवजी त्यात करण्यात आला होता. १८३८ मध्ये ख्रिश्‍चन फ्रेड्रिक सोबेन याच्या संशोधित सूत्रावर आधारित हा सेल्सचा वापर होता.

बेन्झ यांची कार


वर्ष १८६७ – फोर स्ट्रोक हे अंतर्गत ज्वलनातून ऊर्जा तयार करणारे इंजिन तयार केले गेले. या पठडीतील इंजिन आज बहुतांश मोटारींमध्ये जगभरात वापरले जाते. या इंजिनाचा नमुना जर्मन तंत्रज्ञ निकोलस ऑगस्ट ओट्टो याने पॅरिसला भरविण्यात आलेल्या एका जागतिक प्रदर्शनात सादर केला होता. याच प्रकारच्या इंजिनाचा शोध जर्न अभियंता रूडॉल्फ डिसेल याने १८९३ ते १८९७ या दरम्यान लावला. १८२४ मधील निकोलस लिओनार्ड सादी कॅरनॉटच्या १८२४ मधील सायकलच्या आधारावर तयार केलेला हा शोध होता. तर १८३० मध्ये हाच प्रयत्न बोनोइट पॉल एमिल क्लॅपेयरॉन याने काहीसा विकसित केला होता.

कोणत्या इंधनाचा सहभाग इंजिनासाठी घ्यावा यासाठीही प्रयत्न या सुमारास युरोपमधील संशोधक करीत होते. १८७०- ऑस्ट्रियात व्हिएन्नामध्ये साध्या हातगाडीवर सिगफ्राइड मार्कस याने अंतर्गत ज्वलनाच्या इंजिनासाठी द्रवभूत इंधन वापरून इंजिन बसविले होते. ती गाडी म्हणजे पेट्रोलवर चालणारी पहिली गाडी म्हणून मानली जाते. मार्कस कार म्हणून ती ओळखली जाते. याच कामामधील संशोधनांच्या प्रयत्नातून मॅग्नोटो टाइप पद्धतीत लो- व्होल्टेज इग्निशनसाठी जर्मन पेटंट दिले गेले. वर्ष १८८८- कार्ल बेन्झ याची पत्नी बर्था बेन्झ हिने मॅनहेम ते फरोझेम यादरम्यान अश्‍वविरहित अशा बग्गीतून प्रवास केला, यामुळेच घोड्याविनाही वाहन शक्य असते, ही संकल्पना दृढ झाली. एक नवा पर्याय मिळाला.

वर्ष १८८९- जर्मनीत स्टटगार्ड येथे गोट्टेलीब डैमलर व विल्हेम मेबॅक यांनी एक वाहन आरेखित केले. त्यापूर्वी साधारण दोन वर्षे 

एनरिको बर्नाडी
आधी इटालीमध्ये एन्रिको बर्नाडी याने आपल्या मुलाच्या तीनचाकी सायकलीला १२२ सीसी व ०.०२४ अश्‍वशक्तीचे इंजिन बसविले होते. त्याने तसे पेटंटही घेतले होते.

अशा विविध टप्प्यांमधून स्वयंचलित वाहनाचा शोध लागला गेल्याचे व तो जनमानसामध्ये पोहोचू लागल्याचे स्पष्ट होते. चारचाकी वा दुचाकी असो, स्वयंचलित वाहनांमुळे दळणवळण, संपर्कसाधनांमध्ये झालेली ही क्रांती-उत्क्रांती विकासाला पुढे नेण्यास कारण ठरली. १९०० पर्यंत स्वयंचलित वाहनांचे मोठ्या प्रमाणावर सर्वांसाठी उत्पादन करण्यास सुरुवात झाली. अमेरिका, फ्रान्समध्ये हे उत्पादन सुरू झाले. मध्य युरोपात राष्ट्राध्यक्षांचे पहिले वाहन म्हणून मोटारकार आणली गेली. १८९७ मध्ये झेकोस्लोव्हाकियाच्या नेस्सेलडोर्फेर वॅगनबेऊ या कंपनीने ती कारखान्यात तयार केलेली होती. या कंपनीचे नाव नंतर टॅट्रा असे ठेवण्यात आले. केवळ स्वयंचलित वाहनांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवून तयार झालेली पहिली कंपनी फ्रान्समधील होती. तिचे नाव होते. पॅन हार्डेट लेव्हासोर. या कंपनीने प्रथम फोर सिलेंडर इंजिन आणले. वाहन उद्योगात पश्‍चिम युरोपने खऱ्या अर्थाने नांदी केली. २० शतकाच्या प्रारंभाची ही नांदी लक्षात घेतली तर १९०३ मध्ये जगातील एकंदर वाहन उत्पादनामध्ये केवळ फ्रान्सने चांगल्या प्रकारे बाजी मारली होती. या वर्षामध्ये एकंदर ३० हजार २०४ वाहनांचे उत्पादन करण्यात आले. फ्रान्समध्ये १९०३ मध्ये एकूण वाहन उत्पादनापैकी ४८.८ टक्के उत्पादन नोंदविले गेले.

वर्ष १८९३ – अमेरिकेत चार्ल्स डुरेया व फ्रॅन्क डुरेया या भावांनी पहिली वाहन उत्पादन कंपनी

फोर्ड कॅडलिक

स्थापन केली. डुरेया मोटर वॅगन कंपनी असे या कंपनीचे नाव होते. मात्र त्यानंतरच्या काळात स्थापन झालेल्या रॅन्सम ई ओल्डस यांच्याओल्डस मोटर व्हेइकल कंपनीने बाजी मारली. बहुउत्पादन तंत्रामुळे त्यांनी आपला ठसा उमटविला . वर्ष १९०३ – हेन्री फोर्ड यांनी फोर्ड मोटर कंपनीची अमेरिकेत स्थापना केली. त्यानंतर त्यांनी कंपनीचे नाव कॅडिलॅक असे ठेवले. डेट्रॉइटचे संस्थापक अन्टोनी डी ला मोथे कॅडिलाक यांच्या नावे हे नाव ठेवण्यात आले.

वर्ष १९०२ – अमेरिकेतील असलेल्या व घोडागाड्यांचे उत्पादन करणाऱ्या मोठे उत्पादक असणाऱ्या स्टडबेकर बंधूंनी विद्युतशक्तीवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती सुरू केली. त्यानंतर १९०४ मध्ये त्यांनी गॅसोलीन म्हणजे पेट्रोलवरील मोटारींची निर्मिती सुरू केली. विशेष म्हणजे १९१९ पर्यंत त्यांनी आपला मूळ उद्योग जो घोडागाडी तयार करण्याचा होता, तोही चालू ठेवला होता.

वर्ष १९०८ – हे वर्ष भारताच्या संबंधातही तसे महत्त्वाचे वाटते. पेरू येथे दक्षिण अमेरिकेतील पहिली वाहन कंपनी सुरू झाली. ग्रीव्ह असे तिचे नाव होते. १८९७ मध्ये भारतातही त्यांनी कार निर्यात केली होती. ब्रिटिश वसाहतींसाठी त्यांच्या मोटारी पुरविण्यात येत होत्या.

सुरुवातीचा हा काळ म्हणजे वाहन उद्योगाच्या दृष्टीने तसा परीक्षेचाच काळ होता. इंधन सर्वत्र मिळत नव्हते. रस्ते चांगल्या स्थितीतच काय पण अनेक ठिकाणी ते नव्हते. लांवचे प्रवास त्यामुळेच तसे कठीण वाटायचे. त्यादरम्यान १८९१ च्या काळात हळूहळू वाहनांबाबत एक प्रकारचे सुसूत्रीकरण-साधारणीकरण व्हायला लागले होते. पुढे इंजिन असणारी, रेअर व्हील ड्राइव्ह असणारी, अंतर्गत ज्वलन करणारे इंजिन, सरकविता येणारे गीयर्स आदी बाबी मोटारींमध्ये दिसू लागल्या होत्या. वर्ष १९१० – आधुनिक आरेखन असणारी बुगाटी टाइप १२ ही रेसर कार बाजारपेठेत अवतीर्ण झाली. वर्ष १९२७ – फोर्डची मॉडेल टी ही मोटार म्हणजे दर्जेदार असणारी मोटार बाजारात आली.

पहिल्या जागतिक युद्धाचे परिणामही या उद्योगावर झाले. चांगले व वाईट असे दोन्ही प्रकारचे हे परिणाम असले तरी तेव्हापासून मोटारी या अधिक सुधारणावादी, गतिशाली व कॉम्पॅक्ट बनविण्यावर भर देण्यात आला. वर्ष १९२१- सॅन्सी लाम्बाडा ही मोटार इटालीमध्ये तयार करण्यात आली. फ्रेमच्या आरेखनाच्या दृष्टीने तिचे महत्त्व अनन्यसाधारण होते. दुसऱ्या जागतिक युद्धापूर्वी असणारी आर्थिक मंदी हादेखील वाहन उद्योगाच्या दृष्टीने सत्त्वपरीक्षेचा काळ होता. त्या दरम्यानच्या काळात बंद दरवाज्यांच्या मोटारी, सलून वा सेदान पद्धतीच्या मोटारी, मागील बाजूस डिक्की वा बूट स्पेसमध्ये सामान ठेवण्याची जागा इंडिग्रेटेड फेडर्स अशा रचनांनी मोटारी तयार होऊ लागल्या. नावीन्यपूर्णतेला महत्त्व देण्यात येऊ लागले. मेकॅनिकल पद्धतीची अभियांत्रिकी उदयोन्मुख अवस्थेतून पूर्णत्वाकडे येऊ लागली.

वर्ष १९३४- फ्रंट व्हील ड्राइव्ह तंत्राच्या मोटारींची निर्मिती सुरू झाली. त्यापैकीच एक म्हणजे सिट्रेऑन ट्रॅक्शनची अवंत ही मोटार. १९५० च्या दशकात सर अलेक लेस्सीगोनीस यांनी इंधनटंचाईच्या काळात त्या वेळी या पद्धतीची मिनी मोटार वापरली होती. वर्ष १९२२- फोक्स वॅगनने बीटल ही मोटार बाजारात आणली. सिट्रेऑन रोस्सालिआ प्रकारातील पहिली डिझेलवर चालणारी मोटार होती. डिझेल इंजिनाचा पर्याय या मोटारीला देण्यात आला होता. दोन महायुद्धांच्या काळात अनेक मोटार कंपन्या लयाला गेल्या. वर्ष १९३६ – पूर्णपणे डिझेल मोटार म्हणून आणली ती मर्सिडिझ बेन्झने २६० डी ही ती मोटार. तसेच हॅनोमाग रेकोर्ड ही दुसरी डिझेल मोटार. त्यामुळे पूर्णपणे डिझेल मोटारीचे श्रेय यांना द्यावे लागेल. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतरचा काळ हादेखील आर्थिक मंदीचा होता. युद्धाच्या काळात अनेक कंपन्यांना लष्करी उत्पादनात सहभागी व्हावे लागले होते. एकंदर त्या काळात झालेले नुकसान व आर्थिक स्थिती यातून त्या बाहेर पडू पाहत होत्या.

वर्ष १९४९ – अमेरिकेत हाय कॉम्प्रेशनचे व्ही ८ हे इंजिन तयार केले गेले. युरोपमध्ये छोट्या मोटारींमध्ये ते बसविण्यात येऊ लागले. तशा प्रकारच्या मोटारी युरोपमधील विविध देशांमध्ये दिसू लागल्या. वर्ष १९५५- ५७ – सैसेन्टो ही १९५५ची व नोव्हा सीन्यूसेन्टो ही १९५७ ची मोटार इटलीमध्ये तयार झाल्या. युद्धग्रस्त इटलीला चाकावर उभे करून पुढे नेण्याचे काम या मोटारींनी नक्कीच केले. इंजिनची ताकद, गतिमानता, फ्रंट व्हील ड्राइव्ह यामुळे या मोटारींनी चांगलीच लोकप्रियता मिळविली. १९५० मधील युनिबॉडी बांधणीही लोकप्रिय ठरली होती. जीपने युद्धकाळात केलेली कामगिरी स्पृहणीय होती. त्यांची चारही चाकांना गती देणारी यंत्रणा (फोर व्हील ड्राइव्ह) ही आकर्षण ठरली व उत्पादकांना इस्टेट पद्धतीच्या वा जीप पद्धतीच्या मोटारींचे आरेखन करणे फायद्याचे ठरले. १९५० मधील फ्युएल इंजेक्शन ही पद्धत नंतरची काही दशके  मार्गदर्शक ठरली आहेत. वर्ष १९६० – या वर्षामध्ये रोटरी वॉकनेल इंजिन व टर्बोचार्जर या संशोधनाने दिलेली नवी दिशा वाहन उद्योगाला वेगळ्या स्तरावर घेऊन गेली. नवे प्रयोग होऊ लागले. फोर्ड मुस्टांग, डॉज चार्जर यांनी युवा अमेरिकी ग्राहकांना खूश केले. युरोपमध्ये फियाट १२४ चे उत्पादन सुरू झाले. त्यांचे उत्पादन रशियामध्ये करण्याचा परवाना देण्यात आला. १९६६ मध्ये टोयोटाच्या करोला या मोटारीने अमेरिकी बाजारपेठेत प्रवेश केला. लॅटिन अमेरिकेत त्यांना चांगले यश मिळाले. तसेच अन्य बाजारपेठेतही जपानी वाहन उद्योगांचा शिरकाव झाला.

■ सद्यस्थिती व आव्हाने

जगामध्ये एका बाजूला मंदीचे वातावरण असल्याचे दिसत असले, तरी वाहन उद्योगांना आशादायी किरण दिसत आहेत. तंत्रज्ञानामुळे, इलेक्ट्रॉनिक्सच्या विकासामुळे वाढत्या आशा-आकांक्षा, इंधनाचे वाढते दर, किफायतशीर किमतीची अपेक्षा व उत्पादनातील मूल्यकपात, नवीन नवीन कंपन्यांचे आगमन, नवनवी मॉडेल्स ग्राहकांपुढे ठेवण्याचे आव्हान वाहन उद्योगापुढे आहे. पर्यावरणस्नेही वाहने तयार करण्याकडेही जागतिक स्तरावर दबाव येत आहे. यामुळेच नवे तंत्रज्ञान मोटारीच्या सर्वसाधारण वापरासह येऊ लागले आहे. लोकांनाही त्याचे आकर्षण व उपयुक्तता वाटू लागली आहे. तशा प्रकारचे विपणनही केले जात आहे. इलेक्ट्रिक, हायब्रीड व फ्युएल सेल या पर्यायी इंधनाच्या वापरातून मोटारी कशा प्रभावीपणे चालतील याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. रेनॉल्ट-निस्सान या कंपन्यांच्या संयुक्त सहभागातून इलेक्ट्रिक मोटारी तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच दुचाकी उत्पादकही त्या अनुषंगाने तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. वाढत्या बाजारपेठेबरोबरच अन्य आव्हानेही वाढत आहेत. कच्चा मालाच्या वाढत्या किमती, मजुरीतील वाढ पाहता उद्योग पुढे नेणे हे आव्हान आहेच. अजूनही वाहन उद्योगाला या स्थितीत बरीच वाटचाल करायची आहे. इंधनाच्या अंतर्गत ज्वलन पद्धतीची इंजिने आजही कायम आहेत. सुपरचार्जिंग व टर्बोचार्जिंगसारखी आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित इंजिने ही पहिल्या जागतिक महायुद्धापूर्वी असणाऱ्या इंजिनांच्या आकारमानाइतकी असली तरी ती ७० पट अधिक ताकद प्रदान करू शकतात. अर्थात जागतिक वाहन उद्योगाच्या वाटचालीत भारतीय उद्योगही नक्कीच वेगळी छाप उमटवू शकेल. विविध समस्यांवर उपाय शोधू शकेल. उत्पादन बंद झाले असले तरी टाटा नॅनो हेदेखील त्याच पर्यायाचे प्रत्यंतर असल्याचे म्हणता येईल हे नक्की.

वर्ष १९७५-२०००- जागतिक स्तरावर वाहन उद्योगात हा काळ अनेक तांत्रिक व आर्थिक बदलांचा असल्याने आधुनिक काळाला सुरुवात झाली असे म्हणता येईल. १९८० मध्ये भारतातही आधुनिक मोटारींचा काळ सुरू झाला. १९८४ मध्ये मारुती मोटारीच्या छोटेखानी मारुती ८०० ने भारतीय रस्त्यांना वळण दिले. जपानच्या सुझुकीसह झालेल्या संयुक्त

■ मारुती ८०० भारतीय रस्त्यांनाही मिळाले वळण 

प्रकल्पातून ही छोटेखानी मोटार तसेच फोर व्हील ड्राइव्ह असणारी मोटार (जिप्सी) भारतात अवतरली. त्याच दरम्यान दुचाकी व व्यावसायिक वाहनांच्या क्षेत्रातही जपानी उद्योग भारतात आले. हा काळ भारतातील वाहन उद्योगांमधील क्रांतीचा होता. फोक्स वॅगनने चीनमधील बाजारपेठेत प्रवेश केला.

(मूळ लेखनकाल २०१५ पूर्वी)

 – रवींद्र यशवंत बिवलकर

(क्रमश:)

***


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा