सोमवार, १७ जुलै, २०२३

  वाहन उद्योग : वर्तमान आणि भविष्य  - भाग १ 

वाहनक्षेत्र…. वेधक मागोवा

वाहन उद्योगाचा विचार करता काळाच्या झपाट्यामध्ये त्या क्षेत्रात झालेले बदल हे अतिशय वेगळ्या स्वरूपाचाचे आहेत. सरुवातीपासून वाहनाची असणारी कल्पना, त्याची व्याप्ती आणि एकंदर वाहनउद्योगाचीही झालेली वाटचाल याचा आढावा घेणारा हा तसा संक्षिप्त इतिहास आहे. विद्युत वाहनांनी, हायब्रीड वाहनांनीही आता नव्या युगात प्रवेश केला आहे. विद्युत वाहनांपर्यंतचा हा प्रवास कसा झाला त्याचा आढावा या लेखांमध्ये घेण्यात आला आहे.

🔵 

वाहन उद्योगाचे स्वरूप नेमके कसे आहे, वाहनांचे प्रकार, त्यांच्या निर्मितीचा इतिहास, वर्तमानातील वाहनांची व वाहन उद्योगाची स्थिती आणि भविष्यामध्ये असणारे वाहन उद्योगाचे रूप, त्याची स्थिती याबद्दल चालणारे वाद-संवाद व चर्चा महाराष्ट्रातील मराठी भाषकांपर्यंत जात असतेच. या साऱ्या गोष्टी लेखरूपात बद्ध करून कायमस्वरूपी एक माहिती भविष्यातही उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून हे लेख सादर करण्याचा प्रयत्न आहे.

🔵

पार्श्वभूमी

आज जगातील एकूणच जीवनशैलीसाठी दळणवळण, वाहतूक या बाबी सर्वात महत्त्वाच्या घटकांमध्ये मोडल्या जातात. अन्न, वस्त्र, निवारा या तीन जीवनावश्यक गरजांमध्ये आजच्या जीवनशैलीत दळणवळण, वाहतूक यांचाही समावेश झाला आहे. यामध्ये वाहतूक ही एकंदर महत्त्वाची गरजच बनली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वाहतुकीच्या साधनांमध्ये झालेले आमूलाग्र बदल आजच्या जीवनशैलीत अनन्यसाधारण आहेत. यामुळेच वाहन उद्योगाला जगाच्या अर्थकारणात एक अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये आज या वाहन उद्योगाने एकंदर देशातील अनेक क्षेत्रांमध्ये आपली ‘गरज’ केव्हाच सिद्ध केलेली आहे. उद्योगांचा विकास, विस्तार, विकासाची कामे यामध्ये वाहनांचे आणि वाहन उद्योगांचे महत्त्व हे त्यामुळेच पायाभूत सुविधा म्हणूनच पाहावे लागते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे साधन, इतकेच वाहनांचे महत्त्व राहिलेले नाही किंवा वाहन ही चैन वा केवळ राजे-महाराजे, संस्थानिक व श्रीमंत, गर्भश्रीमंत यांचीही मक्तेदारी राहिलेली नाही. देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळातील आर्थिक विकासामध्ये वाहन उद्योगाने महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच वाहन उद्योगाने आपली गतीही चांगलीच वाढविली. देशांतर्गत वाहन उद्योगांनी तर आता आपली पताका युरोपातही झळकाविली. त्यामुळे जागतिक स्तरावरील एककेकाळच्या बड्या कंपन्यांच्या पंगतीत भारतीय वाहन उद्योगाने अग्रस्थान पटकाविण्याचे निकष तसे केव्हाच प्राप्त केले आहेत. त्याचीच फलश्रुती टाटा मोटर्स, अशोक लेलँड, महिन्द्र आणि महिन्द्र, टीव्हीएस मोटर कंपनी, बजाज, फोर्स या कंपन्यांच्या वाहननिर्यातीच्या आकडेवारीबरोबरच त्यांचे जागतिक कंपन्यांच्या स्पर्धेतील स्थान, काही जागतिक कंपन्यांबरोबरचे समझोता करार, टेकओव्हर यातून दिसून येते. विद्युत वाहने, हायब्रीड वाहनेही आता उद्योगांमध्ये समाविष्ट होत आहेत, त्यातूनच टेस्लासारख्या नामांकित कंपन्याही जगामध्ये पुढे येऊ पाहात आहेत. इतकेच नव्हे तर भारतात विद्यमान कंपन्यांनीही त्या विद्युत वाहन निर्मितीत उडी घेतली आहे. दुचाकी विद्युत वाहन निर्मितीत तर नव नव्या कंपन्या, स्टार्टअप्स येऊ घातले आहेत. यात कोण किती काय करतो, किती टाकाव धरतो ते काळ ठरवेल.

भारतीय वाहन उद्योग मग तो चारचाकी वाहनांचा असो की दुचाकी वाहनांचा, ट्रॅक्टर्ससारख्या शेतीसाठीच्या आवश्यक वाहनांचा असो की ट्रक, बस यांसारख्या व्यावसायिक वाहनांचा… या सर्व प्रकारच्या वाहनांच्या निर्मितीत भारतीय वाहन उद्योगांनी अग्रेसर राहाण्याचा मान मिळविला आहे. केवळ त्यांनी भारतात केलेली कामगिरी व त्यामुळे भारतीय जनमानसात त्यांची असणारी प्रतिमा, त्यामुळे देशातील विकासकामांना मिळालेली गती, त्यातून निर्माण झालेली व होत असलेली देशांतर्गत ग्राहकांची वाढ यामुळेच परदेशातील वाहन उद्योगांनाही भारतीय बाजारपेठेचे आकर्षण निर्माण झाले. त्या कंपन्यांनीही भारतीय बाजारपेठेत प्रवेश करून जणू स्पर्धेचे वातावरण तयार केले. यामुळे चांगले व वाईट दोन्ही परिणाम झाले असले तरी त्यामुळे वाहन उद्योगाला एक गती मिळाली यात शंका नाही. आज घडीला भारतातील या वाहन उद्योगांना आवश्यक अशा मूलभूत सुविधा म्हणजे रस्ते, पूल या घटकांच्या संख्येत-प्रमाणात वाढ होत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काळात असणारी स्थिती आणि आजची स्थिती यामध्ये मोठा फरक जाणवू लागला हे नाकारता येणार नाही. किंबहुना वाहन उद्योग व रस्तेबांधणी, उद्योगांमधील वाढ त्यांचा विकास, शेतीमधील चढउतार या साऱ्या परस्परांवर अवलंबून असणाऱ्या बाबी आहेत. त्यामुळेच देशाच्या विकासात, लोकांच्या जीवनशैलीत फरक पडला आहे. शहरीकरणाकडे वाटचाल अधिक जोमाने सुरू झाली आहे, हे जरी सत्य असले व त्यामुळे आणि लोकसंख्येच्या वाढीमुळे लोकांच्या मानसिकतेत, जीवनशैलीत चांगलावाईट जो फरक पडला आहे; हे जरी सत्य असले तरी त्यामुळे वाहनांच्या संख्येत पडलेली व पडत असणारी भर, पेट्रोल-डिझेल या इंधनावर देण्यात येणाऱ्या सरकारच्या सवलतींबाबतचा वाद, वाढणाऱ्या इंधनदराचा ताण, सीएनजी-एलपीजी या पर्यायी इंधनावरही वाहने चालविण्यासाठी दिला जाणारा भर, सोलार ऊर्जा, वीज, इतकेच नव्हे तर पाण्यावरही मोटार चालविता येईल या दिशेने चाललेली संशोधने अशा विविध सकारात्मक व नकारात्मक घटकांचा आज वाहन उद्योगावर परिणाम झाला आहे. त्यातूनच वाहन उद्योगाला भविष्याची जडणघडण करावयाची आहे. महाराष्ट्रासारख्या उद्यमशील राज्यामध्येही वाहननिर्मितीचे कारखाने आहेत. ते आणखी वाढावेत यासाठी प्रयत्न असले तरी वाहन सवलती व कमी कटकटी असणाऱ्या अन्य राज्यांमध्येही पर्याय दिले जात आहेत.

***

 वाहनाबाबतची प्राचीन भारतीय संकल्पना

भारताचा प्राचीन इतिहास, पुराणातील संकल्पनेनुसार, आर्य सनातन हिंदू धर्मातील देव-देवतांबाबत असलेल्या माहितीनुसार भारतात वाहन ही संकल्पना नवीन नाही. फक्त ते वाहन म्हणजे पशू, पक्षी यांच्या शक्तीवर चालणारे साधन होते. केवळ नुसतेच साधन नाही, तर त्या देवतेच्या गुणधर्माचे ते प्रतीकही बनले होते. सर्वसामान्यांच्या दृष्टीने वाहन ही बाब पालखी, हत्ती-घोडे, रथ अशा दृष्टीने प्रत्यक्षात आणली गेली. स्वयंचलितपणा मात्र त्या वाहनांमध्ये नव्हता. ते ऊर्जेचे प्रतीक असणारे सजीव स्वरूपातील साधन होते. अर्थात त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी असलेली गरज त्यामुळे साध्य होत होती.


गणपतीचे वाहन उंदीर, शंकराचे वाहन नंदी म्हणजे बैल, विष्णूचे वाहन गरुड, देवीचे, अय्यप्पन यांचे वाहन वाघ, चंद्राचे वाहन ससा, यमाचे वाहन रेडा, सूर्याचे वाहन सात घोडे असलेला किंवा सात डोक्यांचा घोडा (जो त्याचा रथ ओढू शकत असे), सरस्वतीचे वाहन मोर, ब्रह्मदेवाचे किंवा सरस्वतीचेही वाहन होते हंस, शिवशंकराचे रूप असलेला भैरव याचे वाहन कुत्रा, लक्ष्मीचे वाहन हत्ती, कामदेवाचे वाहन पोपट, इंद्राचा ऐरावत म्हणजे चार हत्तींनी ओढले जाणारे शक्तिशाली प्रतीकात्मकतेचे स्वरूप असे वाहन… अशा प्रकारे विविध देवदेवतांची ही वाहने. या वाहनांचा संबंध या देवदेवतांच्या कथांमध्ये आलेला दिसतो. अर्थात ही वाहने व्यावहारिक अर्थाने उपयुक्त असल्याचे मानले तरी त्यामागे सृष्टीमधील प्राणीमात्रांबाबत माणसाच्या दृष्टीने असणारी उपयुक्तता पाहिली गेली. कृषी आधारित समाजव्यवस्थेमध्ये वाहनाचे महत्त्व हेही अनन्यसाधारण असल्याचे दिसते. बैल, घोडा, रेडा, गाढव, हाताने ढकलायची गाडी अशा स्वरूपातील प्राणी व त्यांचा वाहनाला गती मिळण्यासाठी केलेला वापर पाहता, भारतीय प्राचीन परंपरेत वा इतिहासामध्येही वाहनाचे महत्त्व दिसून येते. वहन – वाहून नेणे या संस्कृत शब्दावरून वाहन या शब्दाचा उगम झाला आहे. देवादिकांची रूपे व त्यांची वाहने हा स्वतंत्र ,वेगळा विषय आहे. मात्र त्यांच्या वाहनांमध्ये असणारी विविधता, त्या वाहनांचे म्हणजे पशू-पक्ष्यांचे, प्राण्यांचे असणारे अस्तित्व, त्यांची ताकद, त्यांच्या स्वभावविशेषांचा-गुणधर्मांचा परिपाक हा देवादिकांनी करून घेतला. त्यांचे जे जे स्वामी म्हणजे मालक होते, त्यांच्याबरोबर त्या त्या वाहन-प्राण्यांचे असणारे संबंध आदी बाबी पाहाता, त्याचा परिणाम आजच्या वाहनांकडे पाहण्याच्या दृष्टीमध्ये आला आहे.

भारतीय धर्माप्रमाणेच ग्रीकमध्ये असणाऱ्या देवदेवतांच्या बाबतही असेच दिसून येते. त्या ग्रीक देवतांची वाहने, त्यांचे गुणधर्म हेही त्या त्या विचारांनुसार असल्याचे दिसते. भारतीय व ग्रीक विचारांनुसार प्राणिमात्रांबद्दल त्या प्राणिमात्राच्या संकल्पित गुणधर्माबद्दल वा त्याकडे पाहाण्याच्या दृष्टीमध्ये फरक असला तरी प्राचीन काळातील या देव-देवता व त्यांची वाहने यांची एक संगती होती. त्या त्या तत्त्वज्ञानानुसार ती विचारात घेतली गेली. त्या त्या भौगोलिक रचनेनुसार त्या प्राण्याचा वापर केला जात होता. प्राणी व त्याची शक्ती ही भिन्न असते, त्याचे गुणधर्म हेही भिन्न असतात व त्यामागे असणारी प्रेरकशक्ती भिन्न असते. त्यानुसार प्राचीन भारतीय काळात देवदेवतांच्या वाहनांमध्ये असे फरक करता येऊ शकतात. काही देव-देवतांची वाहने वेगवेगळी असल्याचेही दिसते. त्या त्या देवतेच्या संबंधित घटनेमधील अभिव्यक्तीनुसार ती वाहने वापरली गेली असावीत. त्यामुळे त्या घटनेतील त्या त्या देवतेच्या अस्तित्वानुसार त्यांची वाहने ही प्रतीकात्मक असल्याचे म्हणावे लागेल. त्या वाहनांची म्हणजे त्यावेळची रूपे व त्यांची शक्ती ही या पारंपरिक संकेतानुसार वापरली गेलेली असावी.

या देवतांचे व त्यांच्या वाहनांबद्दलचे समाजाच्या आदिम मनात असणारे अस्तित्व हे आजही कायम आहे. या प्राणिमात्र असणाऱ्या वाहनाचे सौंदर्यही लोकांना भावले आहे. त्यामुळेच अलीकडच्या वाहनांमध्येही ती रूपे तो पाहत असतो. त्या प्राण्यांचे सौंदर्य हे त्या वाहनांमध्ये पाहताना जाणवले जाते. तशी रूपे त्यांना द्यायला आरेखनकारांनाही आवडते ते या लोकभावनेच्या अनुषंगानेच. पक्ष्यांची उड्डाणातील गती, त्याची सहजता, त्याची असणारी शक्ती व सहज वावर करण्याची ताकद किंवा एखाद्या प्राण्याची ताकद, अजस्र असणारे त्याचे रूप व त्याची ठेवण, धावताना असणारी त्याची झेप, धडकदार वृत्ती अशा बाबी या वाहनांच्या आरेखनामध्येही आणल्या गेलेल्या दिसतात. इतकेच काय त्यांची नावेही अशा प्राण्यांसंबंधात वाहनासाठी ठेवली जातात. निसर्गावर मात करण्याचा पाश्चिमात्य दृष्टिकोन असला तरी निसर्गतत्त्वाला साकारून, त्याचा वापर करून घेण्याचा मुत्सद्दीपणाही त्यांनी ठेवलेला आहे. वाहनांच्या रचनेतही त्या बाबींचा विचार केला गेला आहे, हे नाकारता येणार नाही. वाहन म्हटले की ऊर्जा हवी. ती ऊर्जा त्या वाहनाला गती देत असते. त्या गतीला बद्ध करून तिचा वापर वहनासाठी केला गेला. मग ती ऊर्जा घोड्याच्या रूपात असो, हत्तीच्या रूपात असो की गरुडाच्या रूपात असो. मुळात ऊर्जा ही या वाहनामागील खरी प्रेरणा आहे. ती जादू नाही, दैवी चमत्कार नाही. माणसाने गरज ओळखून, निसर्गातील घटकांचा वापर करून ही ऊर्जा तयार केलेली आहे. ती प्रत्यक्ष प्राणिरूपात प्राणस्वरूपात असो की वाफेवर चालणाऱ्या इंजिनाची असाे, ती विशिष्ट स्वरूपात रुपांतरित केली गेली. त्याचा वापर करून वाहनासारख्या वस्तुरूप घटकाची निर्मिती झाली. ही निर्मिती करण्यासाठी ऊर्जेची व त्यातून तयार होणाऱ्या शक्तीचे मापन करण्यासाठी नवीन विज्ञानातील काही संज्ञा दिली गेलेली नाही. अजूनही अश्‍वशक्ती हेच परिमाण विचारात घेतले जाते. ज्याला आपण हॉर्स पॉवर म्हणतो त्याला लघुशब्दात ‘एचपी’ म्हटले जाते. भारतात पुराणकथांमधून दिसणारी वाहने प्रत्यक्षात कशी व किती? तर मोर हे कार्तिकेयाचे वाहन किंवा वाघ हे देवीचे वाहन, पण ही सर्वच वाहने माणसांकडून काही वापरली गेली असल्याचे दिसत नाही. त्यांच्या शक्तीचा, देखणेपणाचा, ताकदीचा, सौंदर्याचा अंदाज घेत वाहनांमध्ये तसे काही देण्याचा प्रयत्न आरेखनकारांनी केला आहे.

ज्ञानेश्‍वरांनी भिंत चालविली असे म्हणतात, पण प्रत्यक्ष व्यवहारात तसे कोणी काही केल्याचा पुरावा नाही. काही झाले तरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तयार करण्यात आलेली वाहनांची ही निर्मिती माणसाने केलेल्या संशोधनाचे, त्याच्या चिकाटीचे, हुशारीचे फळ आहे. तो दैवी नसला तरी मानवी चमत्कार नक्कीच म्हणता येईल. त्यामागे असलेली जिद्दही लक्षात ठेवायला हवी. म्हणूनच वाहननिर्मिती ही एकाच कंपनीच्या अखत्यारित झालेली नाही. अनेक कंपन्यांकडून स्पर्धात्मक स्तरावर त्यात विकास होत गेला. अनेक व्यक्तींच्या संशोधनात्मक वृत्तीने ही वाहने निर्माण होत गेली विकसित होत गेली. ही प्रक्रिया पुढेही चालत राहणार आहे; मग ती सेदान असो की बहुपयोगी मोटार (एमयूव्ही) किंवा स्कूटर असो की मोटारसायकल वा तीन चाकी रिक्षा; ट्रॅक्टर असो की अन्य अर्थमूव्हर, बस असो वा ट्रक….! विमान असो की हेलिकॉप्टर, लॉंच, होडी व अगदी मोठ्या बोटीपर्यंत वा पाणबुडीपर्यंत असणारी ही सारी वाहनेच. या ठिकाणी जमिनीवरून चालल्या जाणाऱ्या वाहनांबाबत आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. रस्ते विकासामुळे वाहनांच्या प्रगतीला मिळालेली गती हीदेखील उल्लेखनीय आहे. यामुळेच केवळ वाहन उद्योग हा वाहनांपुरता ऑटोमोटिव्ह उद्योग म्हणूही मर्यादित राहिलेला नाही. त्याचा लोकांच्या जीवनशैलीवर मोठा प्रभाव पडला आहे. अर्थात वाहनासाठी केलेला नेहमीपेक्षा स्वतंत्र अशा ऊर्जेचा वापर पाहता, माणसाची असलेली संशोधक दृष्टी किती वेगळ्या स्तरावर जाऊ शकते, त्याचा प्रत्यय येतो. त्यातूनच आजच्या ऑटोमोबाइल या संज्ञेला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. एका संशोधनातून आलेला प्रत्यय, त्यातून उमजलेले गुण-दोष आणि त्या संशोधनाला आणखी विस्तारित करून पुढे नेण्याचा वैयक्तिक व संस्थात्मक प्रयत्न हे वाहन उद्योगाच्या यशामागील खरे गमक म्हणावे लागेल. वाहनांच्या या निर्माणातील सिंहावलोकन पाहणे त्यामुळेच लक्षणीय ठरू शकेल. वाहनांच्या विविध प्रकारांचा तसेच त्यांच्या उपयुक्ततेच्या दृष्टीने असणाऱ्या वर्गवारीचाही आढावा लिखाणाच्या दृष्टीने अगत्याचा ठरतो.

(मूळ लेखनकाल २०१५ पूर्वी)

 – रवींद्र यशवंत बिवलकर

(क्रमश:)

***

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा